होय, स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतो आम्ही !
![]() |
होय, स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतो आम्ही ! |
आई वडिलांच्या स्वप्नांवर चालणारे तुम्ही,
रयतेचे धनी !
आमच्या आई वडिलांना म्हातारा म्हातारी म्हणून हिणवणारे आम्ही,
याचीच खंत वाटे मनी !!
पण हा स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही !
दाही दिशांना अस्मानी संकट असताना निर्भीडपणे तोंड देणारे तुम्ही,
रयतेचे धनी !
थोडं काही आयुष्यात वाईट प्रसंग आले की आत्महत्येसारखा भयाड मार्ग निवडणारे आम्ही,
याचीच खंत वाटे मनी !!
पण हा स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही !
परस्त्रीला आई आणि बहिण माणून त्यांचा आदर करणारे तुम्ही,
रयतेचे धनी !
वाईट नजरेने डोळ्यातील पुण्य वाया घालवणारे आम्ही,
याचीच खंत वाटे मनी !!
पण हा स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही !
सुपारीच्या खांडाच देखील व्यसन नसणारे तुम्ही,
रयतेचे धनी !
सकाळी सकाळी दिवसाची सुरुवातच टपरीवर करणारे आम्ही,
याचीच खंत वाटे मनी !!
पण हा स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही !
सोन्या-चांदी चा अहंभाव नसावा म्हणून कवड्याची माळ घालणारे तुम्ही,
रयतेचे धनी !
स्वतःच असं काहींच अस्तित्व नसताना स्वतःच्या नावासमोर राजे लावणारे आम्ही,
याचीच खंत वाटे मनी !!
पण हा स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही !
जात-पात मोडून समतेच्या विचारांची ज्योत पेटवणारे तुम्ही,
रयतेचे धनी !
२१ व्या शतकातले जाती पाती वरून भांडण करणारे शिलेदार आम्ही,
याचीच खंत वाटे मनी !!
पण हा स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही !
स्वराज्य स्थापन करून शत्रूला पराभूत करून व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात करणारे तुम्ही,
रयतेचे धनी !
आळस असल्यामुळे काहीही न करता फक्त सोशल मिडिया वर दिखावा करणारे आम्ही,
याचीच खंत वाटे मनी !!
पण हा स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही !
उभ्या आयुष्यात जगावं कसं याच मूर्तिमंत प्रेरणास्थान तुम्ही,
रयतेचे धनी !
तुमचे विचार आचरणात न आणता फक्त डिजे च्या तालावर हातात भगवा ध्वज घेऊन नाचणारे आम्ही,
याचीच खंत वाटे मनी !!
पण हा स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही !
शून्यातून विश्व निर्माण करावं तसं स्वराज्याचा अविष्कार करणारे तुम्ही,
रयतेचे धनी !
नवीन काही सुचत नाही, उद्योग करायला पैसा नाही म्हणत नौकरीच्या नावाने रडणारे आम्ही,
याचीच खंत वाटे मनी !!
पण हा स्वतःला मात्र शिवभक्त समजतो आम्ही !
कवी / लेखक : सुजित नामदेव तांबे
0 Comments